छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पाणीपुरवठ्याचे नियोजन करता यावे म्हणून किमान १२ तास आधी पूर्वसूचना मिळावी, यासाठी महापालिकेच्या ’जल बेल’ अॅपमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या अद्ययावत प्रणालीनुसार आता नागरिकांना जलवाहिनी गळतीची तक्रार नोंदवण्यासोबतच, त्यावर झालेली कार्यवाही आणि दुरुस्तीनंतरची प्रत्यक्ष छायाचित्रेही अॅपवर पाहता येणार आहेत.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आयुक्त अमोल येडगे यांच्या सूचनेनुसार उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागरिकांना १२ तास आधी पाणीपुरवठ्याची माहिती देणारी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत नागरिकांनी सुमारे २५ ठिकाणच्या जलवाहिनी गळतीची माहिती दिली असून, त्यातील १५ ठिकाणांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. आतापर्यंत ८५ हजारांहून अधिक नागरिकांनी ’जल बेल’ अॅप डाऊनलोड केले असून, दररोज १५ हजारांपेक्षा अधिक नागरिक याचा वापर करतात. शहरातील दोनशेहून अधिक ठिकाणच्या पाणीपुरवठ्याची माहिती यादरम्यान दिली जात असून, आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक सूचना नागरिकांना पाठविण्यात आल्या आहेत.